Friday, February 6, 2009

संध्याकाळची गोष्ट

त्या दिवशी नेहमीसारखी माझी आणि सकाळ व दुपार यांची गाठ पडलीच नाही. संध्याकाळी जाग आल्यावर फार फार विचित्र वाटत होते. झोप जणु अंगात मुरलेली होती. डोके सुन्न झालेले. मनात एक अजुन दिवस झोपण्यात गेला अशी भावना ( जी फक्त झोप पूर्ण झाल्यावरच येते).

आळस घालवण्यासाठी मैदानावर फिरायला गेलो. मैदान माणसांनी फुलुन गेले होते. कोणी सायकल शिकत होते, कोणी व्यायाम करत होते. काही जण वजन कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. सुंदर आया आपल्या सुंदर बाळांना फिरवत होत्या. मुले विविध खेळ खेळत होती. मी मैदानाभोवती फेऱ्या मारू लागलो. पायांच्या गतीबरोबरच माझ्या विचारांना देखिल गती मिळू लागली. घामाबरोबरच झोप बाहेर पडू लागली. झोप सोडून आपण बरेच काही करू शकतो, खरच इतके झोपायची गरज आहे का? असे नेहमी येणारे विचार आजही मनात आले.

तीन-चार फेऱ्यांनंतर एक सुंदर मुलगी माझ्यासमोरुन गेली. ती माझ्या विरुद्ध दिशेने फेऱ्या मारत होती. माझे पाय गतीमान झाले. नंतरच्या एकदोन फेऱ्यात आमची नजरानजर झाली. नंतर स्मितहास्याची देखील फेरी झाली. नंतरच्या फेरित मात्र ती दिसलीच नाही. [ :( ] पाय दुखत असुनही मी अजुन दोन फेऱ्या मारल्या. ( का ते कळले असेलच!) मन थोडेसे नाही बरेच खट्टू झाले. कोण होती ती? तीचे चालणे का थांबले? कदाचित सातच्या आत घरात असेल! कुतुहल, प्रश्न, विचारांच्या भोवऱ्यात मी गुरफटुन गेलो.

अचानक मनात विचार आला की अरे काही क्षण, प्रसंग हे साबणाच्या फुग्यांसारखे असतात. त्यांचे आयुष्य काही वेळेचेच असते. त्या वेळेत त्यांचा भरभरून आस्वाद घ्यायचा. त्यांचे हळुवार तरंगणे बघायचे. विरून गेले, संपले म्हणून दु:ख का करायचे? मी फेऱ्या थांबवून परतीच्या वाटेला लागलो.

अरे हो! पुढचा विचार सांगायचा राहुनच गेला. एक फुगा विरला तर काय झाले आपण दुसरा फुगा हवेत सोडू शकतॊ की! हल्ली मी दररोज मैदानात जातो.