Wednesday, January 12, 2022

राहूनच गेलं

खिडकीतून पाऊस बघितला नुसता

भिजायचं राहूनच गेलं


बघत राहिलो दूरून तिला

बोलायचं राहूनच गेलं


सीमारेषेवरून खूपदा खेळ पाहिला

खेळायचं राहूनच गेलं


जमेल का मला? लोक काय म्हणतील?

ह्या विचारांत पाऊल पुढे टाकणं राहूनच गेलं

एकामागून एक वर्षे सरत गेली

जगायचं मात्र राहूनच गेलं


माझ्या थापा - १२ नंबरची बस

जेव्हा मी नोकरीच्या शोधात होतो तेव्हाची गोष्ट आहे. कधीकधी दुपारच्या वेळी वेळ घालवायला मी एका मोठ्या झाडाखाली असलेल्या बसस्टॉपवर जाऊन बसायचो.एके दिवशी असाच बसस्टॉपवर बसलो असताना एक सुंदर मुलगी तिथे आली. एका मागोमाग एक सगळ्या नंबरच्या बस येऊन गेल्या पण ती कोणत्याच बसमध्ये चढली नाही. आता मात्र माझ्या मनातले नोकरीचे विचार जाऊन मी तिचा विचार करू लागलो.


माझ्यासारखीच वेळ घालवत असेल का? ..

नाही नाही गळ्यात कसलीतरी कार्ड दिसतंय. मग कोणाची तरी वाट बघत असेल का? ..

किती नशीबवान आहे हिचा बॉयफ्रेंड! इतका वेळ वाट बघतेय तरीही चिडचीड नाही. …

तंद्री लागलेलीच विचारांची इतक्यात आवाज ऐकू आला 

एस्क्युज मी? 

मी बंदच असलेले हेडफोन कानांतून काढत म्हणालो,  येस?

 

१२ नंबरची बस बराच वेळ झाला आली नाही. तिची फ्रिक्वेंसी कमी आहे का?


अहो १२ नंबरची बस इथे येतच नाही, तीचा मार्ग वेगळा आहे. ती तर पुढच्या चौकात मिळेल तुम्हाला


ओह! पण हा काय नंबर लिहीलाय स्टॉपवर!


खरच दिसत होता १२ नंबर 

तेव्हढ्यात २१२ नंबरची बस.आली आणि सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला. पक्ष्यांच्या कृपेने २ हा अंक झाकला गेला होता. मजेशीरच प्रसंग होता तो. आम्ही दोघे हसू लागलो.


बोलता बोलता सहज मी तीच्या ऑफिसमध्ये ओपनिंग आहे का विचारले आणि माझा रेझ्युमे पाठवून दिला आणि सुदैवाने काही दिवसांनी मला नोकरी मिळाली देखील. 


तर अशी १२ नंबरची बस मला नोकरी मिळवून देणारी….


ही आणि ती

चाहूल लागता हिच्या पावलांची

मी हळूच तिला लपवतो

चेहरा असतो अगदी साळसूद

पण पोटात गोळा आलेला असतो


खात्री झाली हिच्या जाण्याची की

मी तिला बाहेर काढतो

चेहऱ्यावर असतात सुटकेचे भाव

आनंद पोटात मावत नसतो


अशी उडते तारांबळ 

लपवण्यात हिच्यापासून तिला

प्रेम आहेच हिच्यावर पण

सोडवत नाही तिला


ही कोण ते कळलीच असेल तुम्हाला

प्रश्न पडला असेल ती कोण आहे?

अहो मी आपला सरळ साधा माणूस

साखर सापडली रक्तात म्हणून मिठाई वर्ज्य आहे


शब्दांवरची धूळ

धूळ खात पडलेले आहेत काही शब्द

कोणासाठी तरी लिहीलेले...

त्याच शब्दांनी घातली होती साद

पण नाही आला अपेक्षित प्रतिसाद

मग मीही गेलो माझ्याच कोषात

आणि शब्द गेले अडगळीत 

अन् पडले धूळ खात...


पण आज ती धूळ मी झटकतोय

शब्दांना रसिकांसमोर सादर करतोय


मला नाही मिळाले प्रेम 

पण शब्दांना तर मिळेल

ठेवेल कोणीतरी त्यांना हृदयात जपून

आणि एखाद्या अलवार क्षणी येतील ओठांवर

मनातलं पोचवण्यासाठी...


मिळेलही कदाचित प्रतिसाद समोरून

आणि मग शब्दही जातील थरारुन

आनंदाने बघतील माझ्या कडे

आणि म्हणतील, बरं झालं धूळ झटकलीस ते


संसाराचं लोणचं हळूहळू मुरायला लागलय

वर्ष दिड वर्ष झालंय माप ओलांडून 

तिच्या सारखेच तोही आलेला आहे घर सोडून

नोकरीच्या नवीन जागी दोघांच बस्तान बसलय

संसाराचं लोणचं हळूहळू मुरायला लागलय


भाताऐवजी आता बिर्याणी, पुलाव बनतोय

दुधपण आता कधीतरीच ऊतू जातय

त्यालापण हळूहळू कुकर लावायला जमलयं

संसाराचं लोणचं हळूहळू मुरायला लागलय


उठबस वाढली आहे पावण्या रावळ्यांची 

शेजाऱ्यांबरोबर सुरू झाली देवाण घेवाण पदार्थांची

दोनाऐवजी चार कप चहा बऱ्याचदा बनतोय

संसाराचं लोणचं हळूहळू मुरायला लागलय


होत कधीतरी भांडण, असतो कधीतरी रुसवा

घरभर असते शांतता धरला जातो अबोला

मात्र एका कुल्फित राग वितळवायला आता जमलय

संसाराचं लोणचं हळूहळू मुरायला लागलय


कळू लागलेत स्वभाव एकमेकांचे

मुखवटे गळू लागलेत वरवरचे

दोघांनीही एकमेकांना आता स्विकारलयं

संसाराचं लोणचं हळूहळू मुरायला लागलय


कधीतरी मला बाजूला ठेव रे

 उठता बसता खाता पिता

बेडवर आणि टॉयलेटमध्ये सुद्धा

कंटाळा आलाय आता मला रे

कधीतरी मला बाजूला ठेव रे


काय ते सतत अंगठा चालवणं

विसरून गेला आहेस धावणं खेळणं जाणं येणं

सहा इंची स्क्रीन बाहेरही आयुष्य आहे रे

कधीतरी मला बाजूला ठेव रे


सहाय्यक आहे मी, बनवलस मला सर्वस्व

पडतो आहेस एकटा, आजूबाजूच्या माणसांकडे दुर्लक्ष

त्यांच्यासाठी आणि स्वत:साठी थोडीतरी सवड काढ रे

कधीतरी मला बाजूला ठेव रे


कोरोना हे निमित्त, करतच होतास अतिरेक

माझ्यापायी हरवलास सारासार विवेक

आता हे सर्व माझ्याकरवीच करशील टाईप आणि पोस्ट

पण कधीतरी जमव मैफिल आणि उघड डायरी रे

कधीतरी मला बाजूला ठेव रे


ये ठंडी हवाएँ भी ना..

बारिश का मौसम हो

सुरमयी शाम हो

बाल्कनी में आप बैठे गरम चाय पीने ही जा रहे हो

इतने मे थंडी हवाएँ लहराती हुई आती हैं

और ले चलती हैं अपने साथ यादों के सफर पर


लहराता हुआ चेहरे पर आया दुपट्टा..

साथ मे खाया हुआ भुट्टा..


वो मोगरे की महक..

और बालियों की झनक..


लहराती ज़ुल्फ़ों से गिरती प्यारी बुंदे..

वो क़समें वो वादे....


अचानक से श्रीमतीजी की आवाज़ आती है

चाय पी ली हो तो ज़रा सब्जी काट देना

फिर क्या, यादों का सफ़र वहीं ख़त्म हो जाता है

और इधर चाय भी ठंडी हो जाती है

फिर से गरम करने को कहूँ तो सवाल आता है

चाय ठंडी होने तक ध्यान किधर रहता है


ये ठंडी हवाएँ भी ना

आ जाती हैं

बे वक़्त 

लहराती हुई..