Thursday, March 24, 2011

छोटीसी चूक

     डॉ. शुक्ला, डॉ. पेडणेकर, डॉ. पटेल आणि जिगरी दोस्त आणि सर्जन. डॉ. सलोनी नुकतेच M.S. पूर्ण केलेली.

     डॉ. शुक्ला सर्जरीमधील एक सिनिअर आणि नावाजलेले नाव. कितीही अवघड सर्जरी कोणत्याही वेळी करायला तयार आणि मोठ्या कुशलतेने, सहजतेने पार पाडणार, प्रसंगी धोका पत्करुन देखील. १००% यशाची खात्री. डॉ. पटेल हे शुक्लांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले एक नावाजलेले सर्जन. प्रचंड उत्साही व उमदे व्यक्तिमत्त्व. डॉ. पेडणेकरांनी काही वर्षांपूर्वीच प्रॅक्टिस सुरू केलेली पण अल्पावधीतच उत्तम जम बसवलेला. जास्त धोका न घेता सावधपणे काम करणारे. डॉ. सलोनी Practical Experience साठी अधेमधे तिघा डॉक्टरांबरोबर सर्जरीसाठी हजर असणारी. डॉ. शुक्लांबद्दल प्रचंड आदर आणि त्यांच्याबरोबर कोणत्याही सर्जरीसाठी एका पायावर तयार.

     शनिवारची रात्र. अकस्मात एक केस पेडणेकरांकडे आली. त्यांची तब्येत थोडीशी नरम असल्याने ते संभ्रमात, केस घ्यावी की नाही. पण शुक्ला, पटेल व सलोनी यांनी भरोसा दिला की Go Ahead!, शुक्ला आहेत बरोबर Don't Worry! ते पार पाडतील व्यवस्थित. थोड्याश्या साशंक मनानेच पेडणेकर तयार झाले. शुक्लांनी शस्त्रे हातात घेतली, सर्जरी चालू झाली. पटेल बाजुला. पेडणेकर व सलोनी थोडेसे मागे. शुक्लांचा हात सफाईदारपणे चालू लागला. सर्जरी अंदाजापेक्षा जास्त लांबत गेली. गुंतागुंत वाढत गेली. शुक्लांनी धोका पत्करुन काही निर्णय घेतले. पटेलांचे शुक्लांच्या प्रत्येक हालचालीकडे बारिक लक्ष, नवीन शिकण्याचा प्रयत्न. पेडणेकर आता काहीसे निर्धास्त झाले. नाहितरी त्यांची तब्येत ठिक नव्हतीच. सलोनी इतक्या मोठया, खुप वेळ चाललेल्या सर्जरीसाठी प्रथमच उपस्थित त्यामुळे दमलेली. थोडक्यात काय तर, सगळेजण शुक्लांच्या भरोश्यावर निर्धास्त. सर्जरी संपतच आलेली आणि अचानक शुक्लांच्या हातुन छोटीसी चुक घडली. एक धमनी कापली गेली. एक-दोन क्षण तर त्यांनाच कळले नाही काय झाले ते! सगळे एकदम सावधान झाले, अंदाज घेतला गेला. फारसे नुकसान झालेले नव्हते. चटकन उपाययोजना करुन मग बाकिची सर्जरी व्यवस्थित पुरी केली गेली.

     चुक तशी लहानशीच, नुकसान तसे फारसे झाले नाही पण ती अनेक भावनिक पडसाद उमटवून गेली.

     पटेलांना थोडेसे आश्चर्यच वाटले. शुक्लांकडुन अशी चुक होईल अशी त्यांना अपेक्षा नव्हतीच. नंतर काय ते बघु, नेमके काय झाले ते नंतर विचारु, आता सर्जरी पार पडु दे असा त्यांनी विचार केला.

     सलोनीला तर धक्काच बसला. ज्यांच्याबद्द्ल आपण इतके गुणगाण गातो, ज्यांना आपण एव्हढे मानतो, ते चक्क चुकले होते. शुक्ला म्हणजे १००% खात्री या विश्वासाला कुठेतरी तडा गेला. आता प्रत्येक सर्जरीला ती शुक्लांना आठवण करुन देते. स्वत: देखील सदॆव दक्ष असते.

     पेडणेकरांनी धक्क्यातुन सावरुन परिस्थिती समजुतदारीने हाताळली. फारसा त्रागा न करता. पण त्यांना ह्या गोष्टीचा बराच त्रास करावा लागला. आता ते सर्जरी शक्यतो स्वत: च करतात. ते देखील पुर्ण बरे असतानाच! No Risk At All!

     आणि शुक्ला, त्यांनी ही चूक फारच मनाला लावुन घेतली. आपल्या हातुन चूक झालीच कशी हा विचार त्यांच्या मनात काही दिवस सतत येत राहिला. अनेक वेळा तो प्रसंग त्यांनी तो Rewind केला, तो क्षण बदलता आला तर.. तसे घडले नसते तर... त्यांना कळत होते, समजत होते की हे व्यर्थ विचार आहेत पण ते त्यांना रोखू शकत नव्हते. सर्वात शल्य ह्याचे होते की ज्या भरोश्याने, विश्वासाने पेडणेकरांनी सर्जरीसाठी बोलावले त्याला तडा गेला. भरोसा मिळवणे कठिण आहेच, तो टिकवणे हे कर्मकठिण! तसेच पेडणेकरांना त्रास झाला तो वेगळाच. पण ह्याच चुकीमुळे शुक्लांना हेही जाणवले की काहीही घडू शकते. ते म्हणजे १००% नव्हे ह्याचे भान त्यांनी सतत ठेवावे. हि घटना म्हणजे मिळालेला एक धडा आहे. ह्या विचाराने त्यांना दिलासा मिळाला. आतादेखील ते कितीही अवघड सर्जरी कोणत्याही वेळी करायला तयार आणि मोठ्या कुशलतेने, सहजतेने पार पाडणार याचा आत्मविश्वास, प्रसंगी धोका पत्करुन देखील. आतातर सहजतेला साथीला सजगता आहे.

Triiiiiiiiing, Triiiiiiiiing, Triiiiiiiiing ....

हॅलो! हॅलो! ओह, पटेल!
कधी? आत्ता? कुठे? पेडणेकर येत आहेत? चालेल ना!
नाही हो, ही माझी छोटीसी चुक सांगत होतो.
आलोच!

दोस्तांनो! जाउन आलोच हा मी.