Thursday, August 20, 2015

कातर आठवणी

संध्याकाळची वेळ
कधीकधी आपण एकटेच असतो अंगणात खुर्ची टाकून बसलेले
हळूहळू सावल्या लांबवर होत जातात अन् अंधारात मिसळून जातात
अशावेळी मनावर पसरू लागतात
        काही कातर आठवणी 
        अगदी लहानपणापासूनच्या...

कधीतरी नकळत झालेला अपमान वा मनाविरुद्ध करावी लागलेली तडजोड
अपयशाची खंत तर कधी अपराधीपणाची बोच
नशीबाने थोडक्यात हुकलेली संधी असो वा कोणीतरी जाणीवपूर्वक केलेली उपेक्षा
कोणाशीतरी धरलेला अबोला तर कधी व्यक्तच न झालेल्या भावना
मिळालेला नकार तसेच नाईलाजाने केलेला स्वीकार
काही चुकलेली गणितं, कधीतरी बिघडलेला सूर
आपल्या जवळच्या व्यक्तीची भासणारी उणीव
करायचे राहून गेलेल्या गोष्टीची हुरहुर

जीव उदास होऊन जातो एकदम अशा कातर आठवणींनी
हळवा भूतकाळ पापण्यांवर जमा होतो मग

थोड्या वेळाने भानावर येतो आपण
तूळशीपुढे निरांजन लावले जाते
नकळत हात जोडले जातात
भगवंताचे नाम मुखी येते

कातर आठवणी मग जातात
            मनाच्या खोल कोपर्‍यात
 परत कातरवेळी मनावर पसरण्यासाठी....