Sunday, November 1, 2015

सात-आठ

      ऑगस्ट महिन्यात चिपळूणला गेलो होतो. शनिवारी तुफान पावसात भरपूर भटकलो. रविवारची सकाळ चांगली दुपारपर्यंत वाढवली होती. सासुबाईंच्या मस्त जेवणावर आडवा हात मारला. "आता झोपायचे नाही" असा अमृताचा ( माझी बायको) प्रेमळ सुचनावजा आदेश (सकाळ उशीरा संपली ना). बाहेर पाऊस चालूच त्यात लाईट गेलेली, मग करायचे तरी काय? चल पत्त्यांचे दोन डाव खेळू असे तिनेच सुचवले. आणि आम्ही सात-आठ खेळायला सुरवात केली.
      हो सात-आठ! आता अगदी रमी, तीन पत्ती, जजमेंट असे वरच्या इयत्तेतले डाव खेळायचे सोडून हा काय पहिलीतला सात-आठ, ते सुद्धा बायको सगळ्या डावात (पत्त्यांच्या) माहिर असताना. अहो बायकोबरोबर सात-आठ खेळायला काय धमाल येते सांगू, तर आमच्या खेळाची सुरवातच कोण आठ घेणार इथपासून झाली. मग दोन पानं - एक लहान आणि एक मोठ्ठ, अस अमृताने समोर धरले. मी एक पान खेचले आणि लगेच तीने दुसरे पान बाकी पत्त्यांत मिसळून "तु मोठ्ठे पान खेचलेच" असे सांगून माझ्यावर आठ दिले आणि खेळाला सुरवात झाली.
      पहिला डाव रडीचा म्हणजे त्यात काही नियम नक्की केले जसे हुकुम नसले तरी डाव फोडायचा नाही, खालचे पान बघायचे नाही इत्यादी. आणि मग खऱ्या डावांना सुरवात झाली. कधी चांगला हुकुम लागायचा तर कधी अगदीच फुटकळ पाने. कधीतरी अनपेक्षितपणे खालचे पान चांगले निघायचे आणि डाव पलटायचा. जोरूच्या गुलामावर राणीची मात होऊन हात मिळायचा. तर कधी तिच्या आवडीच्या इस्पिक एक्क्यावर माझ्या हुकमाच्या सत्तीने मात व्हायची. माझे हात ओढल्यावर तिच्या चेहऱ्यावर फुलणारे बदाम बघण्यासाठी कधीतरी मी चौकट राजा देखील बनायचो.
      असे एकामागून एक डाव रंगत गेले आणि अचानक 'आधी चहा घ्या' अशी सासूबाईंची हाक ऐकू आली. चहा? अरे वाजले किती? साडेपाच? बापरे! दोन वाजता खेळायला चालू केलेले. चक्क साडेतीन तास खेळत होतो आम्ही!  आता हा शेवटचा डाव. जो हात ओढेल त्याला काहीतरी दयायचे असे ठरले आणि डाव सुरू केला. तिकडे चहा थंड होत होता आणि इकडे पैजेच्या डावाची रंगत वाढलेली. शेवटी एका हुकुमाच्या सत्तीने माझी बत्ती गुल झाली आणि माझा एक हात ओढला गेला. आता मला अमृताला एक ........ दयायचय.

      तर असा हा सात-आठ चा डाव. दोघांचा. सोपा तरीही मजा आणणारा. मग कधी घेताय तुम्ही खेळायला? आणि हो, हात ओढल्यावर काहीतरी हटके दयायचे ठरवा :)