Sunday, October 29, 2017

झालय का कधी तुमच्या संग

झालय का कधी तुमच्या संग
उडुन गेलेत चेहऱ्यावरचे रंग
     निराशा आगंतुकाप्रमाणे मनात ठाण मांडून बसलीय
     जग निरर्थक वाटू लागलय
     बिन चेहऱ्याची चिंता मनावर पसरली आहे
     आणि नकारात्मक विचारांच उठलय मोहोळ
अशा परिस्थितीत 
    कोणाचा तरी दूरध्वनी आलाय आणि चार गप्पा झाल्यात 
    कंटाळून आकाशवाणी चालू करावी अन् ते गाणं ऐकू यावं
    विचारात चालत असता पारिजातकाचा गंध दरवळलाय 
    सहज वर्तमानपत्र उचलावं अन् मस्त लेख वाचनात आलाय
अवचित पण हवीहवीशी घडलीय ही घटना
अन्  क्षणात  नूर पालटून  गेलाय
     नकारात्मक विचारांच मोहोळ थंडावतय
     बिन चेहऱ्याची चिंता पळून जातेय 
     निरर्थक जगात अर्थ वाटू लागतोय
     आगंतुक निराशा पळू लागली आहे
     आणि चेहऱ्यावर परतु लागलेत रंग
     झालय का कधी तुमच्या संग