Friday, January 9, 2015

स्वप्नवत मावळत!

गेल्या शनीवारी माझा मुक्काम सासुरवाडीला होतो. मी आणि बायकोने (माझ्या) संध्याकाळी परशुराम या ठिकाणी फिरायला जायचे ठरवले (पार संध्याकाळपर्यंत चालणारी दुपारची झोप टाळून). तिथे समाधान वाटणारे, शांत आणि सुंदर देऊळ आहे. तसेच आजूबाजूच्या परीसरातून सूर्यास्त छान दिसतो. तर काय आमची तयारी सुरू झाली. बायको आरशाला भेटायला गेली आणि मी बायकोच्या ड्रेसशी माझा शर्ट मॅचिंग नव्हता म्हणुन घातलेला शर्ट मी काढून दुसरा शर्ट इस्त्री करून आणला. बायको फार सुंदर दिसत होती (कोणत्याही दडपणाखाली मी हे लिहित नाही आहे). "प्लेजर" मस्त चकाचक करून ठेवलेली होती. 5.15 च्या गोरज मुहूर्तावर आम्ही प्रस्थान केले.

परशुराम तसे चिपळूणहून जवळ आहे. शहर सोडले की वळणावळणाच्या मुंबई महामार्गा लगतच पण डोंगरावर आहे. मी "प्लेजर" मुद्दामच हळू चालवत होतो (का ते परतीच्या प्रवासात सांगेन). वाटेत बायको ती कधी कधी आणि किती किती वेळा तिथे गेली ते सांगत होती (मैत्रिणींबरोबरचे वर्णन मी जास्त मन लावून ऐकले).

देवळापाशी पोचलो. गाडी थोड्या अंतरावर लावली आणि पायर्‍या (पन्नासएक असतील) उतरुन देवळात गेलो. देऊळ खरच सुंदर आणि स्वच्छ आहे. बाजूलाच तळी आणि गोमुख आहे. प्रसन्न वाटले. भक्ती तर असतेच पण त्याचबरोबर शांती व तृप्ती मिळाली की अमृतानुभवच जणू. पायर्‍या चढून गाडीपाशी येईपर्यंत दमछाक झाली. सवय राहीली नाही ना आजकाल चढायाची (पायर्‍या). मग झकास कोकम सरबत घेतले. आता वेध लागले होते ते विसावा पाईंटवरून सूर्यास्त बघण्याचे...

रवीभाऊ आमच्यासाठी थोडावेळ रेंगाळलेलेच होते. पाईंटची जागा मस्तच आहे. महामार्गालगतच एका वळणावर थोडी मोकळी जागा आहे. समोर दरी असून दरीपलिकडे अजून एक डोंगर. मधल्या भागात  बारमाही वाशिष्ठी नदी, तिच्या बाजूने जाणारा रेल्वेमार्ग. खोर्‍यातील एक दोन गावे, हिरवीगार शेतं, त्यांचे हिरव्या रंगाच्या विविध छटांचे चौकोनी तुकडे. अप्रतिम नेपथ्य जमले होते सुर्यास्तासाठी! आणि हो एक छोटीशी टपरी पण होती तिथे.

तर काय आम्ही मोक्याचे टेबल पकडून बसलो. हवेत गारवा होता. आसमंत मावळतीच्या अगणित रंगछटांनी भरून गेला होता. हळूहळू सूर्य समोरच्या डोंगरापलिकडे अदृश्य झाला पण त्याचे रंग त्याच्या बरोबर न जाता काही काळ तसेच रेंगाळत राहीले. दरम्यान आमच्या समोर गरमागरम कांदा भजी व वाफाळता चहा आला. एका हातात बायकोचा हात आणि दुसर्‍या हातात चहाचा कप आणि समोर मावळतीच्या रंगांचा विलोभनीय आविष्कार! जसजसा काळोख पसरू लागला तसतशी खालच्या गावांतील दिव्यांनी दरी उजळू लागली. मागच्या बाजूने निशाकराने आपली एंट्री घेतली होती. संध्याकाळचा शो संपून रात्रीचा सुरू झाला होता

निघावेसे वाटतच नव्हते पण माझ्या नसले तरी बायकोच्या घड्याळाला काटे होते. परतीचा मार्ग धरला. गाडी हळूच चालवत होतो (गाडी हळू चालवली की बायकोचे तुमच्याकडे जास्त आणि ट्रॅफिककडे कमी लक्ष लागते.). गाडीवर लागणारी गुलाबी थंडी आणि कानाशी बायकोचे गोड आवाजात "शारद सुंदर चंदेरी राती" गाणे म्हणजे काय सांगू तुम्हाला, सोने पे सुहागा!      

   घऱ आले पण मन काहीकाळ तिथेच रेंगाळत होते, मावळतीच्या रंगांसारखे.......

  

No comments:

Post a Comment