Sunday, November 26, 2017

चित्र

एकदा मी चित्र काढण्याचे ठरवले
कागद, रंग, पेन्सिल सर्व गोळा केले
   मनातलं उतरु लागलं कागदावर
   समाधानाचे रंग पसरू लागले मनावर
तितक्यात काय झाले
धक्का लागला की मीच चुकलो
पण एक अनपेक्षित फटकारा
अन् सारे चित्र खराब झाले
   उदासीचे रंग दाटले मनावर काही वेळ
   जर-तर चा सुरू झाला खेळ
पण मग विचार आला मनात
सल आहेच खराब झालेल्या चित्राची
पण चित्रकला तर अजून जिवंत आहे हातात
उचलू पुन्हा रंग नव्या उमेदीने
अन् साकारू सुंदर चित्र

Sunday, October 29, 2017

झालय का कधी तुमच्या संग

झालय का कधी तुमच्या संग
उडुन गेलेत चेहऱ्यावरचे रंग
     निराशा आगंतुकाप्रमाणे मनात ठाण मांडून बसलीय
     जग निरर्थक वाटू लागलय
     बिन चेहऱ्याची चिंता मनावर पसरली आहे
     आणि नकारात्मक विचारांच उठलय मोहोळ
अशा परिस्थितीत 
    कोणाचा तरी दूरध्वनी आलाय आणि चार गप्पा झाल्यात 
    कंटाळून आकाशवाणी चालू करावी अन् ते गाणं ऐकू यावं
    विचारात चालत असता पारिजातकाचा गंध दरवळलाय 
    सहज वर्तमानपत्र उचलावं अन् मस्त लेख वाचनात आलाय
अवचित पण हवीहवीशी घडलीय ही घटना
अन्  क्षणात  नूर पालटून  गेलाय
     नकारात्मक विचारांच मोहोळ थंडावतय
     बिन चेहऱ्याची चिंता पळून जातेय 
     निरर्थक जगात अर्थ वाटू लागतोय
     आगंतुक निराशा पळू लागली आहे
     आणि चेहऱ्यावर परतु लागलेत रंग
     झालय का कधी तुमच्या संग



Monday, April 17, 2017

बाई आणि त्यांचे विद्यार्थी

      माझ्या सासुबाई प्राथमिक शिक्षिका आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्याबरोबर चिपळूणला एका लग्नसमारंभास गेलो होतो. लग्न सासुबाईंनी ज्या गावातून नोकरीस सुरवात केली त्या धामेली या गावातील होते. सासुबाई सगळेजण बऱ्याच वर्षांनी भेटतील म्हणून एकदम खुशीत होत्या. त्यांचे विद्यार्थी, गावातील माणसे याबद्दल भरभरून बोलत होत्या.
     
      लग्न लागले. आम्ही निवांतपणे न फिरणाऱ्या पंख्याची हवा खात बसलो होतो. एव्हाना आपल्या बाई आल्या आहेत हे कळल्यावर 3५-४५ वर्षांचे विद्यार्थी त्यांच्या भोवती गोळा झाले. काहीजण तर चक्क अहेराची व जेवणाची रांग सोडून! मग काय सुरू झाला बाई आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचा गलका...
     
बाई मला ओळखले का?
अरे! तू तर .... ना? किती बदलला आहेस!
काय करतोस हल्ली? छान छान!
बाई, मीच तुमचा लाडका होतो ना? हा अजुनही भांडतो मी लाडका म्हणून.
अरे तो ... आला नाय काय, इथेपण चुकवाचुकवी चालुच!
बाई आणि विद्यार्थी आठवणींच्या तासात अगदी रंगून गेले.
     
      माझ्याशी बोलताना बऱ्याचजणांनी मला सांगितले, बाईंनी कष्ट घेऊन आम्हाला इंग्रजी शिकवले म्हणून आम्ही इथवर पोचलो, बाई शाळा सुटल्यावर पण घरी शिकवायच्या, आमच्या आयुष्यात बाईंमुळे फरक पडला.

      २०-३० वर्षांपूर्वी धामेलीसारख्या गावात मन लावून, जीव तोडून केलेले विद्यादान, मुलांबद्दलची माया, अभिमान, मुलांना बाईंबद्दल वाटणारा आदर, प्रेम, कृतज्ञता हा साराच माझ्यासाठी हा मस्त अनुभव होता. आपल्या पेश्याद्वारे विद्यार्थी घडवणाऱ्या अश्या सर्व बाईंना, गुरुजींना प्रणाम आणि गुरुंबद्दल कृतज्ञ असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक💐