Monday, April 17, 2017

बाई आणि त्यांचे विद्यार्थी

      माझ्या सासुबाई प्राथमिक शिक्षिका आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्याबरोबर चिपळूणला एका लग्नसमारंभास गेलो होतो. लग्न सासुबाईंनी ज्या गावातून नोकरीस सुरवात केली त्या धामेली या गावातील होते. सासुबाई सगळेजण बऱ्याच वर्षांनी भेटतील म्हणून एकदम खुशीत होत्या. त्यांचे विद्यार्थी, गावातील माणसे याबद्दल भरभरून बोलत होत्या.
     
      लग्न लागले. आम्ही निवांतपणे न फिरणाऱ्या पंख्याची हवा खात बसलो होतो. एव्हाना आपल्या बाई आल्या आहेत हे कळल्यावर 3५-४५ वर्षांचे विद्यार्थी त्यांच्या भोवती गोळा झाले. काहीजण तर चक्क अहेराची व जेवणाची रांग सोडून! मग काय सुरू झाला बाई आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचा गलका...
     
बाई मला ओळखले का?
अरे! तू तर .... ना? किती बदलला आहेस!
काय करतोस हल्ली? छान छान!
बाई, मीच तुमचा लाडका होतो ना? हा अजुनही भांडतो मी लाडका म्हणून.
अरे तो ... आला नाय काय, इथेपण चुकवाचुकवी चालुच!
बाई आणि विद्यार्थी आठवणींच्या तासात अगदी रंगून गेले.
     
      माझ्याशी बोलताना बऱ्याचजणांनी मला सांगितले, बाईंनी कष्ट घेऊन आम्हाला इंग्रजी शिकवले म्हणून आम्ही इथवर पोचलो, बाई शाळा सुटल्यावर पण घरी शिकवायच्या, आमच्या आयुष्यात बाईंमुळे फरक पडला.

      २०-३० वर्षांपूर्वी धामेलीसारख्या गावात मन लावून, जीव तोडून केलेले विद्यादान, मुलांबद्दलची माया, अभिमान, मुलांना बाईंबद्दल वाटणारा आदर, प्रेम, कृतज्ञता हा साराच माझ्यासाठी हा मस्त अनुभव होता. आपल्या पेश्याद्वारे विद्यार्थी घडवणाऱ्या अश्या सर्व बाईंना, गुरुजींना प्रणाम आणि गुरुंबद्दल कृतज्ञ असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक💐


No comments:

Post a Comment